शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

चारोळी

आवडत मला नेहमीच आव्हानं स्विकारायला.
जे आहे असाध्य ते साध्य करायला.
हारजीत काय चालणारच,
पण बर वाटतं अंगातली रग जिरवायला.

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

सावधान

टाळलं नाही एकही,
अंगावर घेतलय प्रत्येक वादळाला,
अखेर गाठलही भुमीला,
पण मंजुर नसावं हे त्या वेड्याला,
म्हणूनच दुर लोटलस का मला,

चल हरकत नाही.!
पुन्हा तयार आहे मी लढायला.


फक्त सावध रहा आता,
येतोय मी,



किनाराच उध्वस्त करायला.

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

मला भेटणार न...?

एक मस्त पार्टी आहे...
आणि त्यातील छानशी जेवणाची पंगत. ताटातल्या पदार्थाचा दुरवर घमघमाट सुटलाय. इथे येणे बऱ्‍याच जणांचं स्वप्न आहे.
पण
मोजक्याच जागा आहेत भोजनगृहात.
प्रवेश मिळवणं हेच पराकोटीच काम आहे. मलाही जायच होतं या ठिकाणी.
या गर्दीत भलेभले अडकलेत, तरीही हे शिवधनुष्य पेलत आत आलोच अखेर.

वाढलीत मस्त चकाचक ताटे. दिसतय बाजुला भरगच्च वाढलेलं.
बाहेरच्यांना हेवा वाटतोय माझा. आता मिही हात धुवून वाट पाहतोय ताटात जेवण येण्याची.?
खरतर जेवण्यासाठी माझी आत बसण्याची जागा वेगळी असताना, यजमानांच्या सोईसाठी दुसऱ्‍याच ओळीत बसवलय .
यामुळे मघाशी दाराजवळ माझ्यामागे असणारे ही जेवायला लागलेत.
अन् मी मात्र पाहतोय बापुडा आशेवर लवकरच आपल्याला ही मिळेलच.

आणि हळुच कानावर येतेय यातुनही जागा कमी होतील.

काय होईल अवस्था...,
पुरेपुर जगतोय...,
नव्हे कोणत्याच शब्दात नाही सांगता येत काय होतय ते....,
आता हे स्वप्न कधी भेटेल नव्हे तर नक्की भेटणार न हा प्रश्न सतावतोय.

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

इशारा

पुन्हा इशारा त्या वेड्या नियतीला,
कुंपणाची भिती असेल सरड्याला.
असेल शक्य तर दाखवच अडवून आता,
या "ठिणगी"त पेटलेल्या वादळाला.

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

परत तेच

परत तोच काळाकुट्ट अंधार....,
हवेत पसरलाय तोच गारवा...,
रातकिड्यांची तीच ती अखंड किरकीर...,
वाऱ्‍याच्या मंद झुळकीसरशी होणारी पानांची सळसळही तीच...,
दिव्याच्या काजळीची छतावर फिरणारी नक्षी....,
मधुनच ओरडणारा चुकार पक्षी....,
नीरव शांततेला चिरुन टाकतोय वेडा...,
केवढा भयाण आवाज करतेय घड्याळाची टिकटिक....,
सहन नाही होत तीच ती छातीतली धकधक....,
दुरवर ऐकु येतोय आगगाडीचा तोच आवाज....,
म्हणजे तीन वाजलेच आजही....,
पाचसहा वर्षांपासुन असचं चाललय आयुष्य आपलं...., ह्रद्याचे ठोके ऐकत पडून राहणं..., परवापरवापर्यत पुस्तकांची साथ होती, मात्र आता तिही नाहीत...,
उरलेत फक्त...,
सताड उघडे डोळे अन् नजरेपुढून धावणारी अगणित स्वप्नं...,
सलतय मनात खोल कुठे...,
आस लागलीय सखे...
बस झाली आता ही प्रतिक्षा...,
वाट पाहतोय मी केव्हाचा.....,
कधी येणार तु......,
कधी येणार तु.........

शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

का नाही

संपुर्ण फलटण तालुका सध्या वाढत्या चोऱ्‍यांनी हैरान झालाय. आता यातल्या खऱ्‍या किती व अफवा किती हे समजत नाही. पण रोज काहीतरी ऐकण्यास भेटतय. आज इथे युवकास अडवून मारहाण, तर काल रात्री एका महिलेस लुटले अशा एक ना अनेक. कोणीतरी 'बाहेर'चे लोक येवून या चोऱ्‍या करत आहेत असाही एक समज आहे, अर्थात ही देखिल अफवाच असेल यात शंकाच नाही. एकंदरीत भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री सातनंतर घराबाहेर पडण्यास लोक घाबरत आहेत.
का होतयं अस.?
वाढती महागाई, तरुणांमधील वाढती बेरोजगारी, एकूणच चाललेले स्वार्थी राजकारण, त्यातच भरीसभर सरकारने थांबवलेली भरती.
मग फक्त अशिक्षीत तरुणच नव्हे तर चांगले सुशिक्षीत तरुणही या वाममार्गास लागणारच. आपल्या थैल्या भरण्यासाठी निघालेल्या शैक्षणिक संस्था भरमसाट डोनेशन घेऊन पदवीचा कागद हाती देतात. अन् मग सुरु होतेय जिवघेणी स्पर्धा. ज्या काही थोड्या नोकऱ्‍या आहेत त्या आधीच 'अर्थपुर्ण' वशिल्याने भरुन भरतीचे नाटक केले जातय. या वातावरणात कर्जबाजारी होऊन शिक्षणाच्या कागदी पदव्या घेणारा युवक मग आणखी काय करणार.
स्वप्न पाहतोय आपण २०२० साली देशाला महासत्ता बनवण्याचे. कस गाठणार आहोत हे ध्येय आपण. समाजातला एक मोठा वर्ग पोट भरण्याच्या विंवचनेत असताना. निराशावादाने नाही हे सांगत पण या कठोर सत्याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाहीच.
अन् हि तर सुरुवात आहे आणि जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर ते समाजासाठी घातकच ठरेल.

चारोळी ९

जपुन ठेवलय तुझ्या प्रत्येक आठवणीला.
नाही सांगत तुलाही असच वागायला.
मागायच आहे फक्त एवढच तुला.
तुझ्या सुंदर ह्रदयात एक छोटा कोपरा दे मला.